'क्युपिड' महाशय डबल शिफ्ट मधे काम करत आहेत का काय असं वाट्ण्याइतपत परिस्थिती चिघळलेली आहे. नाही म्हणजे मी आधी 'मदन' लिहून पाहिलं बरं का, पण... तो उगीच चावट भावना जागृत करणारा लेख वाटायला लागला म्हणून मग 'क्युपिड' चा वापर पक्का केला. असो... तर सांगायचा मुद्दा हा की, हल्ली आसपास कुठेही बघा "घायाळाला मिळे एक घायाळ नजर" अशी परिस्थिती आहे. जो तो प्रेमात पडलेला आहे, लव मॅरेजेसचं तर पीक आलंय - कोणताही टॉम, डिक एन्ड हॅरी लव मॅरेज करतो हल्ली. तरीही आस्मादिकांना काही केल्या ते जमत नाहिये, ही गोष्ट अलाहिदा !! असो... पुर्वी कसं हो, फक्त स्मार्ट, हॅन्डसम आणि कर्तबगार अशा तीन कॅटॅगरितली मुलं लव मॅरेजेस करायची आणि ते ही फक्त गुड लूकिंग किंवा श्रिमंत मुलींशी. खतम मामला रफा दफा !! पण आता तसं नाही राहिलं, माझ्या शेजारी बसणारा साऊथ इंडियन रेड्डी सुद्धा लव मॅरेज करतो आणि आमच्या सोसायटी मधला शेमडा सून्या सुद्धा. आणि हे कमी की काय म्हणून रेड्डी साहेब बायकोचे फोटो पिकासा वर अपलोड करुन आम्हाला लिंक इ-मेल करतात की "Please take a kind look at my recently married wife" (???????????) हो हो अगदी अस्संच मेल करतात साले. अशा पोरांना पोरी मिळतातच कशा ?? त्यांच्यात गट्स वगेरे आहेत ह्या भ्रामक कल्पना मला मान्य नाहित (म्हणजे मी करत नाही मान्य, नाही तर सेल्फ इस्टीम का काय असतो, तो दुखावला जातो माझा). 'क्युपिड' रावांची दयाद्रुष्टी ह्या पलिकडे मला तरी काही एक कारण दिसत नाही त्यांच्या ह्या यशाचं. तर पुन्हा एकदा (ह्या वेळी अगदी उश्वास वगैरे सोडून) असो...
सात-एक वर्षांपूर्वी मी शुक्रवार पेठेत 'आबा' नामक ग्रुहस्थांच्या बंगल्यावर cot basis वर रहात होतो. ह्या आबाचा सगळा गोतावळा होता निरेला. निरेहून त्याचा नातू अधुन मधुन हिशोब बघायला पुण्यात यायचा. त्याचं नाव टिनू, आम्ही त्याला टिन्या म्हणायचो. तसा होता गावाकडचा गावी पण पुण्यात आल्यावर जरा डॅशिंग रहायचा प्रयत्न करायचा आणि मुलींच्या बाबतीत जरा अभ्यासू वृत्तिचा होता. गावी शेती वगेरे चिक्कार होतीच म्हणून पैसा ही मुबलक असायचा. ह्या साहेबांचा रोजचा टाइमपास म्हणजे काय, तर Symbiosis college canteen मधे तळ ठोकून रहाणे. मग काय वाटलं काय, उगिच नाही मी त्याला डॅशिंग म्हणालो - च्यायला आम्ही पुण्यात शिकत होतो तरी कधी Fergusson College च्या पुढे घास जायचा नाही आमचा आणि हा पठ्ठा खेड्यातून यायचा आणि थेट Symbiosis!! संध्याकाळी घरी परतल्यावर साहेब मागिल बाजूस असलेल्या आमच्या खोलीत येऊन, पलंगावर आडवं होउन, डोक्याखाली दोन्ही हात घेउन, सिलिंग फॅन कडे एक टक नझर आणि संगीताची लय धरल्यागत मान हलवत उद्विग्न होउन मला म्हणालेला,
"आभ्या, गड्या ५ वर्ष बघ लईत लई!"
"कशाची?"
"ह्या तुमच्या पुण्यात मराठी पोरांना अजून ५ वर्षांनंतर एक बि पोरगी घावणार नाय बघ! आरं लेका मी बघतोय ना, पुण्या-मुंबई च्या मराठी पोरी त्या पंजाब्यांच्या मधाळ हिंदीवर मरतायत रं. अन् ती गूरं बी शायनिंग मारायचा एक चान्स सोडतील तर शप्पथ." इथे पॉज घेउन पुन्हा एकदा फॅन कडे नजर करून मान नकारार्थी हलवत म्हणाला,
"अशानं अवघड व्हइल रं ! आता टिन्यासारख्या गावाकडच्या गड्याने Symbiosis च्या मुली लव मॅरेजेस करतायेत म्हणून हळहळण्याची काहीच गरज नव्हती पण आमचा टिन्या अशा बाबतित हळवा होता खरा. तर टिन्याचं ते भाकित खरं ठरतं का काय अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. असो.. इथे विषय तो नाहिये, विषय वेगळाच आहे. विषय आहे 'I love you cha'. तुम्ही म्हणाल कसा तर तो असा -
I love You! ह्या वाक्याचं महत्त्व मी काही वेगळं सांगायची गरज नाहिये. I suppose everyone of us has used it atleast once in our lives or shall use it in future. आणि जर का ह्या वाक्याचा वापर होणारच नसेल आयुष्यात तर मग त्यांच्यासाठी लिहून ठेवलेलंच आहे
'हाये कमबख्त तूने पी ही नही'.
तर लव मॅरेज ह्या प्रकरणातलं "I love you!" म्हणजे पहिलिच पायरी असते. तिथुनच सगळी सुरुवात होते. उत्तर या तर 'हो' असतं किंवा 'लाजून हासणे अन् हासून ते पहाणे' असं असतं किंवा मग 'नो' असतं या फिर कडक आवाजात 'घरचे हेच संस्कार का ?' असा तिखट प्रतिप्रश्न तरी असतो. (कृपया वाचकांनी येथे 'चॅलेंज' देउ नये,
लेखकाचा अनुभव दांडगा आहे) उत्तरावर आधारित मग पुढची प्रगती असते. त्या उलट अरेंज्ड मॅरेज मधलं "I love you!" तिथे 'नो' ची भीती नाही पण तरिही अततायीपणा नाही करता येत, उगाच समोरच्याला आपण 'डेस्परेट' वगेरे वाटणं 'रिस्की' आहे नाही का? शिवाय ते खरं सुद्धा वाटायला हवं, उगिच आपलं 'वाटलं म्हणून म्हणालो'
असं नाही चालणार ना. थोडक्यात काय तर, "It has to be timed to perfection". तर आता पुन्हा, माझा एक मित्र आहे, आम्ही त्याला बाप्पा म्हणतो. तर ह्या बाप्पाचं नुकतंच लग्न ठरलंय, अरेंज्ड ठरलंय (घ्या, अरेंज्ड ठरलंय म्हणे, म्हणजे 'ठरलेलं ठरलंय' असा अर्थ झाला त्याचा. असं असतं विंग्रुजी साळंतून शिकलं की - असो..) तर हा किस्सा आहे त्याच्या पहिल्या "I love you!" चा. हा पठ्ठा नोकरी परदेशात करतो, मध्यंतरी भारतात जाउन सुपारी उरकून आला. आल्यानंतर त्याच्या कडून ऐकलेली ही कहाणी -
माझी आणि तिची एकांतात अशी भेट झालिच नव्हती ना रे ह्या सगळ्या गडबडीत. पाहण्याचा कार्यक्रम गर्दीत, बैठकिचा कार्यक्रम गर्दीत आणि सुपारीचा तर अभूतपुर्व गर्दीत. त्यामुळे पुण्यात जेव्हा दोघांनिच भेटायचं ठरवलं तेव्हा जबरा 'एक्साईटमेंट' होती मनात. शनिवारी भेटायचं ठरलेलं, मी शुक्रवारीच पूणे गाठलेलं. तेव्हाच तिला डिनरला चल म्हणणार होतो पण म्हटलं साला डेस्परेट नको व्हायला. नाही म्हणायला मित्रांना पार्टी देणं बाकी होतंच, मग तो कार्यक्रम उरकला शुक्रवारी रात्री. झोपायला आपसूकच उशिर झाला आणि सकाळी लवकर भेटायचं ठरलेलं, त्यामुळे अर्धवट झोपेत उठून लाल डोळे घेउन गेलो मी. तिने एरवी नोटीस नसतं केलं पण आदल्या
रात्री पार्टी झाली आहे, हे कळाल्यावर, लाल डोळ्यांची सांगड तिने पार्टी बरोबर घातली आणि मला, "तुम्ही 'ड्रिंक्स्' नाही ना घेत?" असा प्रश्न केला. "घेत असतो तरी तुझ्यासाठी सोडली असती", हे उत्तर सुचलं मला पण ते रोमँटिक वाटेल का डेस्परेट हा कौल काही मनाने लवकर दिला नाही म्हणून आपल्या साध्या "नाही" वर भागवलं. मग तिथून तिला जरा शॉपिंग करायची होती ती करायला गेलो, दुपारचं जेवण झालं आणि मग पिक्चरला गेलो. थोडा इकडे तिकडे टाईमपास करून मग तिला सोडायला घरी गेलो. पार्किंग मधे गाडी लावुन मी सुध्दा तिच्याबरोबर वर जायला निघालो पण तिच्या चेहर्यावर टेन्शन दिसलं, मला साधारण अंदाज आला की रूमवर आत्ता कोणी नसेल.
मग उगिच तिला अडचणीत टाकण्यापेक्षा तिथुनंच बाय केला आणि निघालो. पहिली भेट तरी त्या मानाने छान गेली होती, त्या दिवसाचे सगळे टार्गेट्स सुध्दा सर केले होते. म्हणजे बेसिक आवडी-निवडी, गिफ्ट शॉपिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 'तुम्ही' वरून 'तू' वर आणणे हे सगळं आटोपलं होतं. रविवारी सुध्दा सगळं OK झालं -
वेळ छान गेला. मग पुन्हा एका आठवड्याचा गॅप आणि पुढच्या विकेण्ड ला पुन्हा भेट. तो शेवट्चाच विकेण्ड होता, सोमवारी रात्री माझी फ्लाईट होती. तसे त्या आठवड्यात फोन वगैरे चिक्कार झाले होते, त्यामुळे दोघेही "comfort zone" मधे होतो. त्यावेळी ती 'jeans' घालणार होती, त्यामुळे मनात एक आशेचा किरण घेउनच मी तिच्या अपार्टमेंट च्या खाली पोचलो. ५ मिन. मधे ती खाली आली. छान दिसते यार ती 'jeans' मधे खूप. तिची रूम-मेट सुध्दा आलेली खाली तिच्याबरोबर. प्रियाने आमची ओळख करुन दिली आणि मी लागलिच 'छान दिसत आहेस' म्हणालो. प्रिया मैत्रिणीसमोर अगदी लाजत वगैरे मला 'Thanks' म्हणाली. मला साला त्यावेळी टांग खेचायचा मोह काही आवरला नाही, म्हणून मी जरा गोंधळल्यासारखा चेहरा करून, "अरे हो... प्रिया तू सुध्दा छान दिसतेस" असं म्हणालो. हा हा हा... मी आणि तिची मैत्रिण जाम हसत सुटलो, प्रियाने मात्र अगदी मी ओरडेस्तोवर मला चिमटा काढला. नंतर बराच वेळ स्वारी गाडीवर सुध्दा तोंड फुगवून बसलेली. डेक्कनला 'ice-cream' खाताना कळी पुन्हा एकदा खुलली आणि मला एक गोड स्माईल दिली. तुला काल पाठवलेला फोटो तेव्हाच काढलाय. त्या संध्याकाळी उशिरा तिला सोडायला घरी गेलो, तेव्हा गाडी पार्क करतानाच तिला बोललो की, "मी वरती येतोय". She thought i was joking, अगदी फ्लॅटच्या दारापाशी पोचलो तेव्हा तिला लक्षात आले की i'm serious. चेहरा खाडकन पडला तिचा, नंतर मग वर वर हसत होती खरी पण आतमधे टेन्शन मधे होती.
"काय ग तू घाबरलियेस क??"
"छे! मी कशाला घाबरू? तू बाहेर थांब ना ५ मिनिट्स, मी खोली आवरुन घेते."
"It's ok, formal नको होवूस फार"
जाउन बसलो मी आतमधे.
"चहा घेणार?"
"नको, काहितरी खायलाच बनव."
ती चमकलीच माझ्या उत्तराने. म्हणजे, एक तर बिचारी टेन्शन मधे होती, expect करत होती की मी २ मिनिट्स थांबेन आणि पळेन तिथून. पण माझा थांबण्याचा बेत पाहुन जरा गोंधळून बघत राहिली माझ्याकडे.
"आई तर सांगत होती की तुझी आई म्हणाली होती, पोरीला स्वंयपाकाची आवड आहे"
भानावर येत म्हणाली, "नाही तसं नाही, बनवते ना - सांग काय बनवू"
"लवकर बनेल आणि चांगलं बनेल असं काहीही चालेल"
"ऑम्लेट बनवू"
"नाही नाही - एवढं सुध्दा लगेच बनायला नको. थोडातरी वेळ लागू दे ना. माझं काम तर व्हायला पाहिजे"
"कसलं काम??" दचकलीच ती.
"कळेलंच यथावकाश, खायला काय बनवणार ते सांग आधी"
तिने पुन्हा एकदा बंद दाराकडे पाहून घेतलं, तो जादूने उघडावा अशी प्रार्थना केली असावी बहुतेक.
"खिचडी??"
"चालेल की व्वा!"
"Seriously खाणार??"
"हो मग, बास्स का"
"ठीक आहे, तू इथेच बस मी बनवते"
"नाही, मी पण kitchen मधे येतो ना. गप्पा मारत मारत बनव"
"नाही नको, तू इथेच थांब"
"का?"
"..."
"का?"
"थांब ना इथेच!" जवळपास विनवणीच केली तिने.
"अगं पण कसलं टेन्शन येतं ते तर सांग"
मग अगदी लाजत, आजिबात नजरेला नजर न देता, खाली बघून, गालातल्या गालात हसत म्हणाली-
"चुकेल काहितरी बनवायला, तू तिथे असलास तर!"
बास बेट्या बास, आपल्या मराठी पोरींची ही जी काही लाजण्यातली monopoly आहे ना - तिची तुलना होउच शकत नाही कशाशी - खलास झालो बघ मी तिथेच, घायाळ का काय म्हणतात ना, तसं झालं बघ माझं
"अगं तू कशीही बनव, कच्चा साबुदाणा दिलास ना, तरी खाइन आवडीने"
"आहाहा!! म्हणे कच्चा साबुदाणा दे. एवढी काय वाईट नाही बनवत मी"
म्हणजे आधी लाजणं आणि नंतर हा लटका राग - it was a deadly combination, i tell you.
शेवटी बनली एकदाची खिचडी आणि खाल्ली मी ती.
"तू अशीच आहेस की गं"
"कशी?"
"खिचडी सारखी - कधी लाजणं, कधी घाबरणं, कधी रागावणं, कधी चिडवणं. सगळं मिक्स्ड"
"हो का?? कसल्या साबुदाण्याची - कच्च्या का पक्क्या??" ती पण जराशा मूड मध्ये येत म्हणाली.
मी तिच्या जवळ सरकलो, हात हातात घेतला आणि म्हणालो,
"Doesn't matter - You know what - I'm truly and madly in Love with you."
आता असा हा इजहार केला मी माझ्या प्रेमाचा, तर तिने खुश व्हावं किंवा लाजावं!! का नाही? पण तिचा चेहराच पडला, आधी हातातला हात सोडवला तिने, मग पुन्हा एकदा बंद दरवाजा कडे नजर टाकली आणि म्हणाली, "निघायचं का आपण आता?"
माझा चेहरा काही फारसा पाहण्यासारखा नाहिये पण त्याक्षणी मात्र तो पाहण्याजोगा झाला असणार ह्याची खात्री आहे मला. नाही म्हणजे, आजवर बरेच "I love you" केले मी आणि त्यात बर्याच वेळा उत्तरादाखल "Get out" ही ऐकलंय मी पण इथे मला कधी नव्हे ती "Me too" ची खात्री होती, तर इथे ही तेच. "भरवश्याच्या म्हशीला टोणगा" म्हणतात तो असा, फरक फक्त एवढाच राहिला की आजवर मी "Get out" ऐकलं आणि ह्या वेळी "Let's Get out" ऐकलं. चला!! हे ही नसे थोडके... हा सुध्दा एक अनुभवच म्हणायचा...
Wednesday, May 28, 2008
Subscribe to:
Posts (Atom)